अकोले (प्रतिनिधी) अवैध प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर 17 जण जखमी झाल्याची घटना कोतूळ ते घोटी जाणार्या रोडवर शिळवंडी गावच्या शिवारात काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. तान्हाजी पांडुरंग घोडे (वय 42, रा. घोटी, ता. अकोले) हे या अपघातात मृत्यू पावले आहे . कमांडर काळी पिवळी जीप (क्र. एमएच 17 जी 8523) चा चालक शहानवाज जुबेर काझी (वय 23, रा.कोतूळ) हा आपल्या ताब्यातील जीपमध्ये अवैधरित्या 12 ते 15 प्रवासी घेऊन कोतूळकडून घोटीकडे चालला होता. शिळवंडी गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला वळणावर असलेल्या खड्ड्यात जीप उलटून त्यात तान्हाजी घोडे यांचा मृत्यू झाला. या अपघातात मंदा उंबरे (वय 38), निकिता पडवळे (वय 17), अनिता घोडे (वय 19), भीमाबाई घोडे (वय 68, सर्व रा. घोटी), मीरा हिले (वय 65), रेणूबाई हिले (वय 57), मनीषा हिले (वय 32, रा.गोंदोशी), शैला वरे (वय 17) व वैशाली वाजे (वय 17, रा.पिंप्री) यांच्यावर पीएमटी लोणी व संगमनेर येथे उपचार सुरू आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे. काजल शिंदे (वय 18), जनाबाई साबळे (वय 18), सुशीला भांगरे (वय 16), मंगल घोडे (वय 19), वैशाली वाजे (17), सुशीला हिले (वय 32), ज्योती पडवळे (वय 18), गौरी मुठे (वय 19) या जखमींवर कोतूळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे व डॉ.सतीश पोरे, कर्मचारी सोनवणे, रोकडे, श्रीमती पाठक आदींनी त्यांच्यावर उपचार केले. घटनास्थळावरून रफिक शेख, अयाज शेख, गुलाब खरात, बाळासाहेब घाटकर यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यात मदत केली. या प्रकरणी भीमा पांडुरंग घोडे (वय 42, रा.घोटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीपचालक शहानवाज काझी यांच्या विरूध्द राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
