श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन

मार्क्सवादी किसान सभा 
व सिटू कामगार संघटनांचा पुढाकार.
विजय पोखरकर | अकोले,
शेतकरी, बांधकाम कामगार व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या शुक्रवारी 
 ( २७ मे ) संगमनेर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मार्क्सवादी किसान सभा व सिटू कामगार संघटनेच्या वतीने शेतकरी व कामगारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
अकोले, संगमनेर व कोपरगाव तालुक्यातून हजारों श्रमिक या मोर्चात सामील होणार असून किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ.अशोक ढवळे, राज्य सहसचिव डॉ. अजित नवले व सिटूचे राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे मोर्चाचे नेतृत्व करून मार्गदर्शन करणार आहेत.
सातत्याचा दुष्काळ, नापिकी, जमिनीच्या मालकीचे प्रश्न व शेतीमालाचे पाडण्यात आलेले भाव, यामुळे शेतकरी अत्यंत संकटात सापडले आहेत. बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांची अहमदनगर येथील कामगार सहआयुक्त कार्यालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे अक्षरशः वाट लावण्यात आली आहे. वारंवार बैठका घेवूनही अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांचे प्रश्न अद्याप सोडविण्यात आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त व वीजबिल मुक्त करा. स्वामिनाथन समितीच्या शिफारसी प्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून हमी भाव द्या. आदिवासींवर व वन निवासींवर इको सेन्सेटीव झोन अंतर्गत लादलेल्या जाचक अटी रद्द करा. निळवंडे धरणाचे पाणी पाईप कालव्यांद्वारे तातडीने अकोले संगमनेर कोपरगाव तालुक्यातील कोरडवाहू गावांना द्या. अकोले तालुक्यातील उच्च स्तरीय कालवे तातडीने पूर्ण करा. देवस्थान व गायरान जमिनी कसणा-या शेतक-यांचे रेकॉर्ड त्यांच्या वारसा नोंदी सह अद्यावत करा. वनाधिकार कायद्याची जनताभिमुख अंमलबजावणी करा. अकोले तालुक्यातील बेलापूर येथे एस.बी.आय किंवा सेन्ट्रल बँकेची शाखा सुरु करा , या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने तीन लाख रुपयाचा मेडिक्लेम सुरु करा. बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी ५००० रुपये देताना असा बांधकाम कामगार तीन वर्षापूर्वी नोंदीत हवा ही अट रद्द करा. सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना साहित्य खरेदी करण्यासाठी ५००० रुपये अर्थ सहाय्य द्या. अहमदनगर कामगार सहआयुक्त कार्यालयात सिटू संघटनेच्या मदतीने बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचे ४७३ क्लेम धूळ खात पडून आहेत. ते तातडीने तपासून त्यानुसार कामगारांना तातडीने लाभ द्या.
नवीन नोंदणीसाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी त्वरित शिथिल करा व तालुकावार वंचित बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी आयुक्त कार्यालयाच्या वतीने शिबिरे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीसाठीचे ५००० रुपयाचे अर्थ सहाय्य कामगारांच्या खात्यावर त्वरित वर्ग करा. बांधकाम कामगारांना वयाच्या ५५ वर्षानंतर ५००० रुपये निवृत्ती वेतन लागू करा. नोंदीत कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये वाढ करून अनुदानात भरीव वाढ करा.
अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांना शासन आदेशाप्रमाणे किमान वेतन व राहणीमान भत्ता द्या. सन २००७ पासूनचा वेतन व राहणीमान भत्यातील फरक कामगारांना द्या. कर्मचा-यांची सेवा पुस्तके अद्यावत करा. पी.एफ.खाते उघडून त्यांच्या पी.एफ. ची रक्कम कर्मचा-यांच्या खात्यात भरा. आदि मागण्या मोर्चात करण्यात येणार आहेत.
मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन कॉ. डॉ. अजित नवले , कॉ. यादवराव नवले, कॉ. सदाशिव साबळे, कॉ. सारंगधर तनपुरे, कॉ. नामदेव भांगरे, कॉ .साहेबराव घोडे, कॉ. भाऊसाहेब मेंगाळ, कॉ. अशोक जाधव, कॉ. शांताराम गायकवाड, कॉ. अविनाश धुमाळ, कॉ. संदीप शिंदे, कॉ. एकनाथ थोरात, कॉ. नंदू गावंडे, कॉ. सुरेश भोर, कॉ. रमेश गायकवाड, कॉ. अरुण पुरी, कॉ. सुरेश भांगर, कॉ. तुकाराम कडाळे, कॉ. लहू जोशी, कॉ. सुखदेव शेंडगे कॉ मथुराबाई बर्डे कॉ ज्ञानेश्वर काकड कॉ लक्ष्मण पथवे, कॉ. शांताराम बर्डे, कॉ. 
शांताराम वारे, कॉ. कमलाकर फापाळे, कॉ. खंडू वाकचौरे आदींनी केले आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post